विवेक आनंद
पहाट होत होती. क्षितिजावर भगवी उषा पसरत होती. गोमंत पर्वता आडून उदीयमान हिरण्यगर्भ वाकुल्या दाखवत प्रकट होत होता. उत्तर रात्री कधीतरी पडलेल्या पावसाने न्हालेला हिरवागार झाडोरा अजूनही ठिबकत होता. थेंबामधून सूर्यकिरणांना परावर्तीत करीत सहस्र रश्मी बनवत होता. आगगाडी आपल्या संथ लयीत चालली होती. नागमोडी वळणे घेत, बोगदे पार करीत उतरण उतरत होती. दोन्ही बाजूंना लावलेली इंजिने ठराविक वेळी आपापल्या शीळा फुंकीत होती. डोंगर दऱ्यामधून त्यांचा मंद प्रतिध्वनी येत होता. विवेकानंदांनी निमिषभर डोळे झाकले, उघडले. आणि..... आणि ..... उजव्या खिडकीतून टपकन रानफुलाची पाकळी टपकली. गोव्याच्या भाषेत सांगायचे म्हणजे कौल झाला होता.
गोव्याला येण्यामागे स्वामीजींच्या डोळ्यासमोर दोन प्रमुख उद्देश्य होते. पहिला देवदर्शन ! दक्षिण काशीतल्या देवतांचे दर्शन ! आणि दुसरा ख्रिश्चन मताचा अभ्यास! स्वामीजींचा मुक्काम बेळगावला होता.बेळगावचे सुप्रसिद्ध डॉक्टर श्री. विष्णुपंत शिरगावकर यांच्याशी त्यांचा परिचय झाला. बोलता बोलता गोव्याचा विषय निघाला. स्वामीजींच्या मनात गोव्याला जायचा विचार आहे हे विष्णुपन्तांच्यालक्षात आले.स्वामीजींच्या प्रवासाची व्यवस्था करायचे त्यांनी ठरविले. मडगाव शहरामधील विद्वान सद्गृहस्थ श्री. सुब्राय नायक यांच्याशी त्यांचा परिचय होता. विष्णूपंतानी सुब्राय नायकांना पत्र पाठविले. स्वामीजींचा परिचय व उद्देश्य लिहून त्यांची राहण्याची व्यवस्था करण्याची विनंती केली. विविध विषयांचे सखोल ज्ञान, समाजसेवेची तळमळ व उदीयमान पत्रकारिता यांचा व्यासंग अशा बहुश्रुत सुब्रायजीनी त्यांची विनंती सहर्ष स्वीकार केली.
श्री. सुब्राय नायकांचे घराणे हे मडगावातील प्रमुख प्रतिष्ठित घराणे. पोर्तुगीज अत्याचार, बाटवा बाटवी, द्वेषमूलक कायदेकानून यांच्यातून मार्ग काढीत स्वधर्म रक्षण करणारे. गोव्यात हिंदू धर्मावरील पहिला पोर्तुगीज आघात सासष्टी तालुक्यात झाला होता. रायतुरचा किल्लेदार दियोगु रुद्रीगीश याने साडेतीनशे देवळांचा विध्वंस केला होता.मडगांव शहरात धार्मिक स्थळाची उणीव भासू लागली. साहजिकच धर्मप्रेमी नायक कुटुंबीयांनी मडगावचे ग्राम दैवत श्रीदामोदार यांच्या पूजा अर्चेसाठी आपल्या घरातील एक मोठी खोली आज ज्याला साल म्हणतात, ते हिंदुना उपलब्ध करून दिले. धार्मिक विधींना सुरुवात झाली. आजही श्रीदामोदाराची नित्यपूजा तेथे मोठ्या भक्तिभावाने केली जाते.
२७ ओक्टोबर १८९२ ! मडगावचे रेल्वे स्टेशन ! शेकडो लोकांचा जमाव तेथे जमला होता. आतुरतेने स्वामीजींची वाट पहात उभा होता. मडगांव मधील प्रतिष्ठित नागरिकांसमवेत श्री सुब्राय नायक स्वामीजींच्या स्वागताला स्वतः उपस्थित होते. रेल्वेचे आगमन झाले. स्वामीजी खाली उतरले. काषाय वस्त्रधारी ते तेजः पुंज धिप्पाड व्यक्तिमत्व, चेहऱ्यावर विद्वत्तेचे तेज, धृढनिश्चयी मुद्रा, परतत्वाचा वेध घेणारी नजर ! ते आले त्यांनी पाहिले आणी त्यांनी जिंकले हे वेगळे सांगायला हवेय ?
श्री सुब्राय नायक यांनी स्वामीजींना आपल्या घोडा गाडीत बसविले. मोठ्या सन्मानाने मिरवणुकीने आपल्या घरी नेले. कोंब वाड्यावरील आपल्या पिढीजात घरात त्यांनी स्वामीजींच्या राहण्याची व्यवस्था केली. सालाशेजारची खोली त्यांना देण्यात आली आणि स्वतः जातीने त्यांची सोय सुविधा ते बघू लागले.स्वामीजींची ध्यान धारणा, चिंतन, देवदर्शन, भेटीगाठी यांची व्यवस्था करू लागले. प्रतिष्ठित लोक भेटायला येत. चर्चा करीत. भारावल्या स्थितीत पूर्ण संतुष्ट होऊन घरी जात. धर्म, मीमांसा, षड्दर्शने, लेखन, समाजसेवा विषयांची समा जुळल्याने श्रोत्यांच्या दृष्टीने ' सोनियांचे दिनु बरसे अमृताचे घनु ' ठरल्यास नवल ते काय!
देवदर्शनासाठी स्वामीजी फोंड्याला गेले. कवळेला श्रीशान्तादुर्गेचे दर्शन त्यांनी घेतले. गोव्याच्या मातीला संगीताचा वास आहे. साहजिकच इथे येणाऱ्याचा श्वास लयकारणारच ! सहजपणे स्वामीजी देवळात मांडी घालून बसले. जगदम्बेशी तद्रूप झाले. त्यांना दुर्गा आठवली. विश्वजननी कालीमातेचे भजन ते गावू लागले. देवळात देवदर्शनाला आलेली भक्त मंडळी सावरून बसली. स्वामीजींच्या मधुर आणि पहाडी आवाजाने ती मंत्रमुग्ध झाली. क्षणकाल का होईना आपल्या आराध्याला, शांतादुर्गा देवतेला मूळ कालीरुपात अनुभवू लागली.स्वामीजी मंगेशीला गेले. फोंड्याचा सगळाच भाग नितांत सुंदर. हिरवीगार शेते, पाचविचार कुळागरे! आणि त्याच्या साथीला त्या हिरवाईत, पाचुई कोंदणात वसवलेली देवालये. स्वामीजींनी श्रीमंगेशा समोर धृपद गायला. आपल्या मधुर रागदारीने उपस्थिताना तृप्त केले. जवळचे गावम्हाड्डोळ ! श्रीम्हालसा देवीचे स्वामीजींनी दर्शन घेतले. देवीसमोर त्यांनी एक सुंदर ख्याल गायला.
ते मडगावी परतले. सालातही त्यांनी श्रीदामोदारासमोर एक चीज आळवली. तब्बल पाऊण तास ते ती चीज विविध रागातून गात होते. गोव्यातील संगीत दर्दिना आश्चर्यचकीत करीत होते.
पर्वतावर याच काळात लयसूर्याचा उदय होत होता. खाप्रुमाम पर्वतकर ! वादनातील एक अनोखा चमत्कार ! एका पायाने त्रिताल, दुसऱ्या पायाने झपताल, एका हाताने लय, दुसऱ्या हाताने चौताल
धरून तोंडाने सवारी म्हणत एकाच वेळी समेवर येणारा हा लयभास्कर . सुब्रायबाबानी खाप्रूमामांना बोलवून आणले. स्वामिजीसमोर त्यांचे वादन झाले. तरुण खाप्रूला वादनासंबंधी सांगताना स्वामीजी म्हणाले, ' लाकडी खोक्याच्या कडेवर बोटांनी वाजवत जसा आपण आवाज काढतो, तसा आवाज चामड्याच्या वरच्या थरातून काढला आला पाहिजे. ' खाप्रूला हे पटेना. त्याला वाटले स्वामीजी आपली थट्टा करतात. हलकेच तसे ते म्हणालेही. स्वामीजी आसनावरून उतरले. बैठक मारून त्यांनी तबल्यावरून हात फिरविला. त्यांची बोटे तबल्यावरून फिरू लागली. दैवी आवाज सालात घुमू लागला. आपल्या वादनाने उपस्थितांना आ वासायला लावणाऱ्या कलावंत खाप्रूचा वासलेला आ पहाण्याचे भाग्य आज सर्वाना मिळाले होते. स्वामीजीच्या वादन कौशल्याने सगळेजण थक्क झाले होते. खाप्रू मामानी स्वामीजींना साष्टांग नमस्कार घातला. त्यांची क्षमा मागितली. आपल्या उमेदीच्या, उभारीच्या अत्यंत तरुण वयात स्वामीजीशी संबंध येण्याचे भाग्य खाप्रू मामांना लाभले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा